मृतगर्भजनन (stillbirth)- एक दुर्लक्षित समस्या

Animish Joshi
2 min readJul 2, 2021

मराठी

अलीकडच्या काळात, जरी वेगाने आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ आणि प्रगती झालेली असली तरीही जग विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जात आहे. माता आणि बाल आरोग्याशी संबंधित अनेक समस्या सतत वाढत आहेत. त्यातलाच एक ज्वलंत परंतु दुर्लक्षित असा विषय म्हणजे “मृतगर्भजनन”.

मृतगर्भजनन म्हणजे काय ?

प्रसुती होण्याआधी गर्भाशयात गर्भाचा मृत्यू होणे म्हणजे मृतगर्भजनन (stillbirth).

जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दर १६ सेकंदाला एका गर्भाचा मृत्यू होतो. म्हणजेच दर वर्षी अंदाजे २ दशलक्ष मृत्यू होतात. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मृत्यू दर अधिक आहे. मृत्यू पलीकडे जाऊन पाहता याचे परिणाम दूरगामी आहेत. विशेषतः स्त्रियांमध्ये मानसिक समस्या वाढतात व कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. इतकेच न्हवे तर सामाजिक समस्या सुद्धा उद्भवतात. इतकी भयंकर परिस्थिती असून देखील असे विषय समाजात दुर्लक्षित राहतात. या समस्येचा मुळाशी गेल्यावर लक्षात येते कि गरोदरपणात व प्रसूती दरम्यान योग्य प्रकारची आरोग्य सेवा नसणे, पोषण आणि आरोग्याविषयी ज्ञान नसणे, अपुरा पोषक आहार, कौटुंबिक आधाराचा अभाव, इ. या मृत्यूंपेक्षा अधिक दुःखी करणारे हे आहे की बहुतेकांना गर्भधारणेदरम्यान आणि जन्माच्या वेळी उच्च प्रतीचे पोषण आणि आरोग्य सेवा मिळत नाही जे कि वेळीच रोखता येऊ शकले असते. सध्याची परिस्थिती पाहता असेच चालू राहिल्यास वर्ष २०३० पर्यंत २० दशलक्ष मृतगर्भजनन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे मृत्यू दर कमी होण्याची आशा आहे, परंतु केवळ जर आपण एकत्र, आता कार्य केले तरच. हे तेव्हाच शक्य आहे जेंव्हा योग्य वेळी आरोग्य सेवेची (गर्भधारणेपूर्वीचा कालावधी पासून ते प्रसुतीनंतरच्या कालावधी पर्यंत) उपलब्धता होईल, सूक्ष्म पोषक आहारासह पुरेसा आहार मिळेल, कुटुंब नियोजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील, इ. इतकेच न्हवे तर या समस्ये विषयी आवाज उठवणे, जागरूकता वाढविणे आणि गैरसमज कमी करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. माता आणि बाल आरोग्याला प्राधान्य देणे अत्यंत महत्वाचे आहे.

--

--

Animish Joshi
0 Followers

Post-graduate student of Public Health Nutrition